नांदेड (वृत्तसंस्था) नांदेडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘खलिस्तान जिंदाबाद’ संघटनेचा सदस्य असलेला सरबजीतसिंग किरट याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पंजाबच्या सीआयडी पथकाने रविवारी उशिरा अटक केली. नांदेडच्या शिकारघाट परिसरातून दहशतवादी सरबजीतसिंघ याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरबजीतसिंग पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील रहिवासी असून, तो प्रतिबंधीत असलेल्या ‘खलिस्तान जिंदाबाद’ या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. सरबजीतसिंघ हा नांदेडमध्ये लपला असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पंजाब पोलिसांचे सीआयडी पथक नांदेडमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिकारघाट परिसरातून दहशतवादी सरबजीतसिंघ याला अटक केली. या प्रकरणी पंजाबच्या अमृतसरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी तिघांना अटक झाली होती. तर एक फरार नांदेडमध्ये लपला होता. अखेर त्यालाही अटक करण्यात आली आहे.