जळगाव (प्रतिनिधी) खान्देशचा आतापर्यंत कधीही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होऊ शकलेला नाहीये. जे जे या पदाच्या स्पर्धेत आले, ते सर्व राजकीय षडयंत्राचे बळी ठरले. माझ्या बाबतीतही भाजपमध्ये असेच घडले होते, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभा निवडणुकीतील एका प्रचार सभेत बोलून दाखवली होती. परंतु आता शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा सुरू झाल्याने खान्देशला आता तरी न्याय मिळेल का? याचीच उत्सुकता सर्वांना लागून आहे. गुलाबराव पाटील यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर जळगाव ग्रामीण मतदार संघात झळकल्यामुळे याची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळात जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या भागातील नेत्यांनी नेहमीच आपापल्या पदाचा व आपापल्या नावाचा दबदबा राज्याच्या राजकारणात निर्माण केलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रतिभाताई पाटील यांनी थेट राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली होती. परंतु राज्याच्या राजकारण्याच्या दृष्टीने विचार केला तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पद नेहमीच खान्देशला हुलकावणी देत राहिले आहे.
सध्याच्या घडीला जळगाव जिल्ह्यात तीन नेते महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामध्ये गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील या तिघांनीही मंत्रीपदाची धुरा चांगल्याप्रकारे सांभाळलेली आहे. आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली तर मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख्याच्या भूमिकेत राहतील व त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पद हे दुसऱ्या शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळेल. त्यामुळे हे पद जळगाव जिल्ह्याला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या नावाची यादी उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू होती परंतु त्यांना आता केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामुळे आता गुलाबराव पाटील यांचा उपमुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा असल्याचेही बोलले जात आहे.
खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून राज्यभर ओळख असणारे तसेच एकनाथ शिंदे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळख असलेले गुलाबराव पाटील यांची थेट उपमुख्यमंत्रीपदी वर्णी वनी लागल्यास खान्देशच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल अशी देखील बोलले जात आहे.