जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देवपिंप्री येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एकावर चाकू हल्ला झाला असून पिस्तूल रोखून धमकावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागले.
याबाबत वृत्त असे की, गुरूवारी मध्यरात्री जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे दोन गटांमध्ये वाद झाला. यात एका गटाने पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. तालुक्यातील देवपिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावरून मध्यरात्री वाद उद्भवला. यातून तलवार व चाकूहल्ला झाला असून दोन जण जखमी झाले. यात परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या प्रकारामुळे निवडणुकीला गालबोट लागले. देवपिंप्री गावातील एका गटातर्फे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांच्यासह सहकार्यांविरूध्द जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीतील माहितीनुसार यमुनाबाई सपकाळे या देवपिंप्री ग्रामपंचायतीसाठी वार्ड क्रमांक ४ मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा भाऊ नितीन प्रकाश सोनवणे हा देवपिंप्री फाट्यावर एकटा बसून लोकांशी मोबाईलवरून संपर्क करत होता. यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम यांनी सुरेश शिंदे, चंद्रशेखर शिंदे, पप्पू शिंदे, त्यांचे दोन शालक, अमृत शिंदे, नितीन पाटील यांचेसह समर्थकांना घेऊन फाट्यावर आले. त्या ठिकाणी निकम यांनी शाब्दिक वाद घातला तर समर्थकांनी चाकूहल्ला केला. तर एकाने पिस्तूल काढून धाक दाखवला. यात नितीन प्रकाश सोनवणे हा जखमी झाला आहे. त्याने याबाबत पोलीसात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
तर, तुकाराम निकम यांनी सुद्धा तक्रार दिली आहे. यानुसार त्यांचे समर्थक नितीन विकास पाटील यांच्यावर गावातच चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यामुळे नितीन सोनवणे यांनी डोक्याला मारून घेतली असून ते आमच्यावर हल्ला झाल्याचा बनाव करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.