पुणे (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केलं आहे. ‘महाराष्ट्र शौर्याची भूमी आहे. विजयस्तंभ विकास आराखडा मंजूर करा, अशी मागणी समोर आली आहे. मागील सरकारने जो निधी मंजूर केला होता तो अजून आला नाही. मात्र एकमेकांवर ढकलून चालणार नाही,’ असं म्हणत अजित पवार यांनी विजयस्तंभ विकासाबाबत भाष्य केलं आहे.
कोरेगाव भीमा लढाईत सैनिकांनी त्यावेळी जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला आजही अभिमान आहे. कोरेगाव भीमा ठिकाणाचा विकास आराखडा मंजूर करा अशी मागणी आहे. कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, सैनिकांनी त्यावेळी जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. कोरेगाव भीमा ठिकाणाचा विकास आराखडा मंजुर करा अशी मागणी आहे. या स्तंभाच्या जवळच्या जागा ताब्यात घेण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. या जागा खाजगी मालकीच्या आहेत. त्या जागा मालकांना योग्य तो मोबदला दिला जाईल आणि या जागा ताब्यात घेतल्या जातील. मी पालकमंत्री आहे आणि अर्थमंत्री देखील आहे. या विकास आरखड्यासाठी आर्थिक बाजू देखील योग्य प्रकारे सांभाळली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही याची ग्वाही देतो, असं अजित पवार म्हणाले.
‘कोरोनाचे संकट असल्यामुळे घरातूनच विजयस्तंभाला अभिवादन करावं. अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र व्यवस्थित बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरी सर्वांनी कोरोना काळात सुरक्षितता बाळगणं महत्वाचं आहे,’ अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी केल्या. अजित पवार यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देत महत्त्वाचं आवाहन देखील केलं आहे. “मावळतं वर्ष कोरोना संकटाशी लढण्यात गेलं, येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो, नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो, सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२१ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.