नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे मागील २०१९-२०२० व चालू २०२०-२०२१ या वर्षासाठी पंतप्रधान फळपीक योजनेत सहभागी न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांसंबंधित पोर्टल केंद्र सरकारला पत्राद्वारे कळवून सुरु करण्याचे निर्देश खासदार रक्षाताई खडसे यांनी कृषी कमिश्नर एकनाथ डवले यांना दिले होते.
कृषी कमिश्नरांनी कृतिशीलता दाखवीत केंद्राला अर्ज सादर केला. त्यामुळे केंद्राने सकारात्मक भूमिका घेत दिनांक २२ ते २६ या पाच दिवसांसाठी पोर्टल सुरु करण्याचे निर्धारित केले आहे. खासदारांच्या प्रयत्नशीलतेबाबत शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे. पंतप्रधान फळपीक योजनेच्या नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी सुरु झालेल्या पोर्टलचा लाभ घेऊन आपली नोंदणी संबंधित बँकेच्या माध्यमातून करून घ्यावी, असे आवाहन खासदार रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
बँकेच्या तांत्रिक त्रुटींमुळे कर्जदार शेतकरी पीडित आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे केळी फळपिकाच्या नुकसानीचा मोबदला मिळण्यापासून शेतकरी वंचित आहे. बँकेच्या नियमानुसार पंतप्रधान फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची वेळेत कागदपत्रांची पूर्तता करूनही कर्जदार शेतकरी पंतप्रधान फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्यापासूनसुद्धा वंचित राहिला आहे. वेळेत कागदपत्रांची पूर्तता करूनही बँकेच्या अंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे फळपीक विमा संबंधित पोर्टल त्याच्या ठराविक मर्यादेनंतर बंद झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत आपली माहिती बँकेकडे सुपूर्द करूनही बँकेमार्फत शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर समाविष्ट होऊ शकलेली नव्हती. शेतकऱ्यांची नैसर्गिक आपत्तीमुळे व कोरोनाच्या कठीण काळात तग धरून राहणे अत्यंत कठीण झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या अडचणींवर खासदारांनी कृषी कमिश्नरांच्या मार्फत मार्ग काढत शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत व विवंचनेबाबत केंद्राला विनंती केली. खासदारांच्या या रास्त मागणीचा केंद्रांनी सकारात्मक विचार करून तब्बल पाच दिवसांसाठी पोर्टल सुरु करण्याचे निर्धारित केलेले आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असून पंतप्रधान फळपीक योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. तरीही सुरु झालेल्या पोर्टलचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व बँकांनीही त्यांच्या तांत्रिक अडचणींवर तोडगा काढून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची माहिती सुरु होणाऱ्या पोर्टलवर समाविष्ट करावी. शेतकऱ्यांच्या हितार्थ बँकांनी आपले बहुमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन खासदार रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांना व संबंधित बँकांना केले आहे.