मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकांसाठीची चुरस वाढू लागली आहे. दरम्यान, २० जूनला पार पडणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांसाठी ‘मविआ’ने ताकद पणाला लावली आहे. गुप्त पद्धतीने मतदान होणार, हे क्लिअर असल्याने सगळ्यांनीच भेटीगाठींना सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार निवडून आणण्याची जबाबदारी अजित दादांवरच (Ajit Pawar) आहे. त्यामुळे खडसेंसाठी अजितदादा मैदानात उतरले आहेत.
सध्याचं संख्याबळ पाहता रामराजे नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र एकनाथ खडसे यांचं पारडं अगदी कट-टू-कट आहे. त्यामुळे मतं फुटल्यास खडसेंना त्याचा थेट फटका बसू शकतो.
शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा फोन आल्याची चर्चा
अजित पवार कामाला लागले असून त्यांनी शिवसेनेच्या गोटातील अतिरिक्त मतं स्वत:कडे फिरवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या काही आमदारांना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा फोन आल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक झाली. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतंफुटीचा धक्का बसू शकतो, यावर चर्चा झाली. तसेच मतांचे प्राधान्यक्रम ठरवण्यात आले.
अजित पवार मैदानात सक्रिय झाल्याबद्दलची संजय राऊतांनी दिली माहिती
विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाठिंब्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आल्याचं समजतं. त्यामुळे आता आपल्या दुसऱ्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेच्या गोटातील आमदारांनाही गळाला लावण्याची शक्यता आहे. या सगळ्यात शिवसेनेचं मत अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र अजित पवार मैदानात सक्रिय झाल्याबद्दल संजय राऊत यांनीही माध्यमांना माहिती दिली.