नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) साळवा शेतशिवारात आपल्या शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहेत. त्यामुळे वन विभागाने योग्य कारवाई करण्याची मागणी होत आहे.
साळवा येथील भरत जगन्नाथ ढाके हे पत्नीसह २० रोजी गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या साळवा शिवारातील सोनवद रस्त्याकडे असलेल्या शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेले असताना त्यांना त्यांच्या शेतापासून जवळजवळ अंतरावरून बिबट्या जात असताना दिसला. बिबट्याचे दर्शन झाल्याने ढाके दाम्पत्यांची एकच तारांबळ उडून ते प्रचंड भयभीत होऊन लगेच घरी परतले. त्यांनी ही घटना गावात येऊन सांगितली. या घटनेमुळे साळवा शेती शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या आधीदेखील जवळजवळ महिनाभरापूर्वी नांदेड व नारणे शेती शिवारात कित्येक जणांना बिबट्याचे दर्शन झाले होते. आता पुन्हा साळवा शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून शेतकऱ्यांनी शेतात एकटेदुकटे जातांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या शेतांमध्ये रब्बी पिकांची कामे सुरू आहेत. त्यातच बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात दहशत आहे. वन विभागाने योग्य कारवाई करण्याची मागणी होत आहे.