नशिराबाद, ता. जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद पेठ हद्दीतील उमाळा रस्त्यालगत असलेल्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी एका शेतकऱ्याची म्हैस व तिचे पारडू चोरुन नेल्याची घटना घडल्याने परिसरातील पशूपालक धास्तावले आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडल्याची माहिती मिळाली.
घटनेच्या वेळी शेतात मुक्कामी असलेल्या सालदाराच्या निदर्शनास ही बाब आली. गोठ्याकडे पाहणी करताना शेतातील एक म्हैस व तिचे पारडू नसल्याचे सालदाराच्या लक्षात येताच त्याने तत्काळ शेतमालक किरण रमेश पाटील यांना ही माहिती दिली. त्यानंतर परिसरात शोध घेण्यात आली; मात्र चोरीस गेलेल्या पशुधनाचा किंवा चोरट्यांचा कोणताही माग काढता आला नाही. चोरट्यांनी उमाळा रस्त्याच्या दिशेने पशूधन घेऊन पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे नशिराबादसह परिसरातील शेतकरी धास्तावले असून, पशूधनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नशिराबाद येथील घटनेप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. वाढत्या पशुधन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तरसोद येथील एका शेतकऱ्याचेही पशूधन चोरीस गेल्याची घटना घडली होती. तसेच काही भागात चोरीचा प्रयत्न झाल्याचे प्रकारही समोर आले आहे. दरम्यान, तरसोद परिसरातील शेतकरी अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी पशूधनाच्या संरक्षणासाठी स्वतः आळीपाळीने जागरण करुन त्यांचे रक्षण करत आहेत. तर आता गुरांची राखण करणे, हे मोठे आव्हान ठरत आहे. कधी कुठून चोरी होईल, याचा भरवसा नाही, म्हणून आम्ही शेतकरी एकमेकांच्या मदतीने रात्री जागून पहारा देत आहोत, अशी प्रतिक्रिया तरसोद येथील एका शेतकऱ्याने दिली.















