पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात आली असताना महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात झाली होती. परंतु, महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटने डोकं वर काढल्याने राज्य सरकारतर्फे नवे निर्बंध लागू करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनंही सुधारीत आदेश काढले आहेत. संचारबंदीच्या काळात पुणेकरांना केवळ अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे.
पुणे महापालिकेनं निर्बंध कठोर करत महापालिका क्षेत्रात जमावबंदी लागू केली आहे. त्यानुसार पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर, सायंकाळी पाच नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही.
पुण्यात असे आहेत निर्बंध !
अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस चार वाजेपर्यंत सुरू राहतील. आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने शनिवार, रविवारी पूर्ण बंद राहणार आहे. इतर दिवशी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. सार्वजनिक बस सेवा ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार आहे. तसेच मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे पूर्ण बंद राहतील. रेस्टॉरण्ट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू राहणार आहे. दुपारी चारनंतर पार्सल देता येणार आहे. शनिवार, रविवार फक्त पार्सल सेवा देता येणार आहे. मैदाने, उद्याने, वॉक, सायकलिंगला रोज सकाळी ५ ते सकाळी ९ या वेळेत मुभा असेल. खासगी कार्यालये दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवता येणार आहे. शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार आहे. आउटडोअर स्पोर्ट्स सकाळी ५ ते सकाळी ९ या वेळेत सुरू ठेवता येणार आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद राहणार असतील. सामाजिक, धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम फक्त ५० लोकांच्या उपस्थित साजरे करता येणार आहे. लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची अट राहील. व्यायामशाळा, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं चालवता येणार आहे. मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवारी पार्सल सेवा देता येईल.