
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथे लग्नसमारंभासाठी कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडून सुमारे ४ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तांबोळे बुद्रुक येथील विलास रघुनाथ पाटील हे २६ जूनला बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी जामनेर तालुक्यात गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. तर, २८ जूनला सायंकाळी त्यांच्या पत्नी, मुलगी, बहिण आणि भाची घरी आल्यात. त्या वेळी त्यांना घराचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर कपडे आणि इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले. रात्री विलास पाटील घरी आल्यानंतर त्यांनी लोखंडी कपाटाची पाहणी केली असता त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. कपाटात ठेवलेले भाच्याने दिलेले ३ लाख ८० हजार रुपये, स्वतःचे २० हजार रुपये अशी एकूण ४ लाखांची रोकड तसेच सुमारे १० हजाराची दोन तोळ्यांची सोन्याची चैन असा एकूण ४ लाख १० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही चोरी २६ जूनला सकाळी ९.३० ते २८ जूनच्या रात्री ८.३० वाजेदरम्यान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चाळीसगाव पोलीस करत आहेत.
















