
जळगाव (प्रतिनिधी) – स्वतःच्या आर्थीक फायद्याकरीता महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेतला जात होता. बिबा गरात सुरु असलेल्या या कुंटणखान्यावर परिक्षाविधीन उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्या पथकाने गुरुवार दि. १३ ऑगस्ट रोजी छापा टाकला. या ठिकाणाहून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर कुंटणखाना चालविणाऱ्या फैजलखान असलमखान पठाण (रा. पटवे गल्ली पिंप्रळा) व देवयानी पाटील (रा. सावखेडा बु. ता. जळगाव) याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बिबा नगर परिसरातील एका भाडेतत्वार घेतलेल्या घरात महिलांना आणून त्यांच्याकडून स्वःच्या
फायद्यासाठी कुंटणखाना चालवित असल्याची माहिती परिक्षाविधीन उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले यांना मिळाली. त्यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष विभागातील महिला पोहेकॉ मनिषा पाटील, साधना शिंदे, अमोल ठाकूर, प्रणेश पवार, योगिता पाचपांडे, धनराज पाटील, हरिष शिंपी यांचे पथक रवाना केले. या पथकाने बनावट ग्राहकाला त्या घरात पाठविले.
इशारा करताच टाकला छापा
बनावट ग्राहक कुंटणखाना सुरु असलेल्या घरात शिरला. तेथून बाहेर पडल्यानंतर त्याने सापळा रचून बसलेल्या पथकाला इशारा करताच त्याने घरावर छापा टाकला. याठिकाणाहून दोन महिलांसह कुंटणखाना चालविणारा संशयित फैजलखान असलमखान पठाण याला ताब्यात घेतले.
मागच्या दरवाजाने महिला पसार
पथकाने छापा टाकून संशयितांना ताब्यात घेत असतांनाच घरातील किचनमध्ये असलेली संशयित महिला मागच्या दरवाजाने झाडाझुडपाचा फायदा घेत पसार झाली. पोलिसांनी त्या महिलेचा पाठलाग केला, मात्र ती महिला मिळून आली नाही.
पीडीत महिलांची सुटका
देहविक्री करवून घेणाऱ्या पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली असून कुंटणखाना चालविणाऱ्या फैजलखान असलमखान पठाण (रा. पटवे गल्ली पिंप्रळा) व देवयानी पाटील (रा. सावखेडा बु. ता. जळगाव) या दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोनि शशिकांत पाटील हे करीत आहे.
















