भुसावळ (प्रतिनिधी) मुंबईतील सांताक्रुझ परीसरातील एका दाम्पत्याच्या पाच लाख 20 हजारांच्या किंमती अंगठ्या जबरीने हिसकावून युपीकडे निघालेल्या दाम्पत्याला भुसावळातील सतर्क रेल्वे सुरक्षा बलाने जनता एक्स्प्रेसमध्ये बुधवारी रात्री 10.30 वाजता बेड्या ठोकल्या आहेत. संशयिताना सांताक्रुझ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. लकीलाल भैय्यालाल सेठ (20) व प्रीती लकीलाल सेठ (22, दोन्ही रा.मेजाखास, प्रयागराज, उत्तर प्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
जबरी लूट करीत दाम्पत्याचे पलायनव !
मुंबई पश्चिम भागातील सांताक्रूज परीसरात तक्रारदार अरविन गुरविंदर सिंग (59, रूम क्रमांक एक, प्लॉट नं.31, सेठी निवास, 17 नॉर्थ एव्हेनु रोड, सांताक्रूज पश्चिम, मुंबई) हे परीवारासह वास्तव्याला आहे. संशयित प्रीती ही मेड म्हणून सिंग परीवाराकडे कामाला होती. या घरातील वयोवृद्धेच्या हातातील डायमंडची पाच लाख रुपये किंमतीची अंगठी तसेच 20 हजार रुपये किंमतीची अंगठी प्रीतीसह तिचा पती लकीलाल यांनी हिसकावून पळ काढला होता. हा प्रकार घडल्यानंतर सिंग यांनी सांताक्रुज पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयित 13202 डाउन पटना जनता एक्स्प्रेसने गावी पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाला वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र काने यांनी सूचित केले. बुधवारी रात्री 10.35 वाजेच्या रेल्वे स्थानकावर जनता एक्स्प्रेस आल्यानंतर जनरल बोगीतून आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली सांताक्रूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन त्रिमूखे, कॉन्स्टेबल लोती दातिर यांनी आरोपींना गुरुवारी रेल्वे सुरक्षा बलाकडून ताब्यात घेत मुंबईत नेले.
भुसावळ स्थानकावर आरोपी जाळ्यात !
भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे विभागीय आयुक्त एच.श्रीनिवास राव, सहाय्यक सुरक्षा आयुक्त अशोक कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व भुसावळ स्थानक निरीक्षक राधाकिशन मीना यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक के.आर.तर्ड, सहायक उपनिरीक्षक दीपक कवले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक उपनिरीक्षक वसंत महाजन, प्रधान आरक्षक सुनील सिंह, प्रधान आरक्षक मनोज कुमार व आरक्षक भजनलाल यांनी ही कारवाई केली.