मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे युवा नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जायचे. राजीव सातव यांच्या निधनानंतर राहुल गांधींनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे की, “मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांचे जाणे हे आमच्यासाठी अपरिमित नुकसान,” अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज (१६ मे) कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
राहुल गांधी यांचे ट्वीट
“मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
भारतीय राजकारणातला सुसंस्कृत चेहरा हरपला
काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.