धरणगाव / जळगाव (प्रतिनिधी) | – गाव पातळीवरील प्रशासन सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख झाले तरच तालुका, जिल्हा आणि अख्खा महाराष्ट्र सक्षम होतो. पंचायतराज व्यवस्था ही लोकशाहीचा कणा असून गावाच्या विकासाची खरी सुरुवात ग्रामपंचायतीपासून होते, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत धरणगाव पंचायत समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी धरणगाव तालुक्यातील ISO मानांकन प्राप्त २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, ISO मानांकन हे केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित न राहता ते सेवा, शिस्त, वेळबद्धता आणि पारदर्शक कारभारातून गावकऱ्यांना प्रत्यक्ष दिसले पाहिजे. ग्रामपंचायतींनी नागरिकांचा विश्वास संपादन केल्यास विकासकामांना गती मिळते. कर वसुलीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कर वसुली ही दंडात्मक प्रक्रिया नसून गावाच्या विकासातील नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. शासन निर्णयानुसार किमान ५० टक्के कर वसुली मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
पर्यावरण संवर्धनाबाबत त्यांनी ‘एक पेड़ माँ के नाम’ या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत, हा उपक्रम पर्यावरण रक्षणाबरोबरच सामाजिक भावनेचा संगम असल्याचे सांगितले. शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने आणि एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धरणगाव पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून धरणगाव तालुका व येथील ग्रामपंचायती विभागीय व राज्यस्तरावर पुरस्कारासाठी पात्र ठराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी अभियानासाठी शुभेच्छा दिल्या.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), भाऊसाहेब आकलाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, पी. सी. आबा पाटील, माजी सभापती श्री मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, पी. एम. पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी वर्ग व पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी बोडरे यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी कैलास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी राजेश इंगळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धरणगाव तालुका ग्रामसेवक संघटनेने विशेष सहकार्य केले. हा कार्यक्रम क्रांतीवीर. ख्वाजा ख्वाजाजी नाईक स्मृती संस्था, डॉ. हेडगेवार नगर, धरणगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
















