
जळगाव (प्रतिनिधी) – शासनाच्या ‘राज्य महोत्सव’ संकल्पनेला साजेसा व उत्साही प्रतिसाद देत महावितरणने भव्य ‘ऊर्जा प्रबोधन मोहीम’ हाती घेतली आहे. ‘हरित ऊर्जा आण विद्युत सुरक्षेच्या माध्यमातून ऊर्जा स्वातंत्र्याकडे वाटचाल’ या ध्येयाने प्रेरित होऊन १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत ही मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यात येत आहे. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून महावितरणचे शेकडो अभियंते सामाजिक बांधिलकी जपत शाळा-महाविद्यालयांतून हरित ऊर्जा, वीज बचत व सुरक्षेचा जागर करत आहेत.
महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार व कार्यकारी संचालक परेश भागवत यांच्या संकल्पनेतून राज्यभर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जळगाव परिमंडलात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, जनमित्र ही मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडलांत कार्यरत कार्यकारी अभियंत्यांपासून ते कनिष्ठ अभियंत्यांपर्यंतची संपूर्ण टीम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना हरित ऊर्जा, वीज बचत आणि सुरक्षिततेचे मोलाचे धडे देत आहे. गेल्या आठवडाभरात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हे उत्साहवर्धक प्रबोधन सत्र पार पडले. विद्यार्थी व नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी महावितरणतर्फे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, ई-व्हेईकल धोरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौर कृषी पंप आणि ‘गो ग्रीन’ यांसारख्या महत्त्वपूर्ण शासकीय योजनांची माहिती दिली जात आहे. सोबतच दैनंदिन आयुष्यात वीज अपघातांना आळा घालण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि उपायांवरही मार्गदर्शन केले जात आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील ताण लक्षात घेऊन सौर व पवन ऊर्जेच्या वापराविषयी जागृती करण्यात येत आहे. सोलर पॅनलसह विद्युत बचत व सुरक्षा यांची सोप्या भाषेत माहिती देण्यात येत आहे. गरज नसताना पंखे, दिवे बंद ठेवावेत, एलईडी दिवे, तसेच स्टार रेटिंग असलेल्या उपकरणांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
केवळ शाळा-महाविद्यालयेच नव्हे, तर राज्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातूनही ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे. उत्सवासाठी केवळ अधिकृत वीज जोडणीचाच वापर करावा, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे ईएलसीबी (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) उपकरण अनिवार्यपणे लावावे, ऊर्जेची बचत करण्यासाठी देखाव्यांमध्ये एलईडी दिव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा आणि हरित ऊर्जेचा संदेश देणारे प्रबोधनात्मक देखावे उभारावेत, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. या राज्य महोत्सवात सर्व नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हरित ऊर्जा व विद्युत सुरक्षेचा हा मूलमंत्र आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आग्रही आवाहन महावितरणने केले आहे.
















