
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या ‘मुन्नाभाई’ अर्थात बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम तीव्र केली आहे. जुन महिन्यात जिल्ह्यात तीन बोगस डॉक्टरांवर थेट कारवाई करण्यात आली होती. अजून पाच संशयित डॉक्टर प्रशासनाच्या रडारवर असल्याची विश्वासनीय माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बोगस डॉक्टरांविरोधातील तपासणी आणि कारवाईची मोहीम काहीशी थंडावली होती. प्रशासनाच्या या सुस्त कारभारामुळे ग्रामीण तसेच निमशहरी भागांत पदवी नसतानाही लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचे पेव फुटले होते. मात्र, आरोग्य विभागाने आता पुन्हा एकदा कंबर कसली असून ‘बोगस डॉक्टर प्रतिबंधक समिती’ सक्रिय झाली आहे.
आतापर्यंत १२ जणांवर गुन्हे दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात जिल्ह्यात एकूण ९ बोगस डॉक्टरांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये यंदाच्या जून महिन्यातच ३ बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. हे डॉक्टर कोणत्याही अधिकृत वैद्यकीय पदवीशिवाय सर्रासपणे अॅलोपॅथिक औषधोपचार करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पाच संशयित डॉक्टर रडारवर
जून महिन्यातील कारवाईनंतर प्रशासनाला आणखी काही संशयास्पद क्लिनिक्सची माहिती मिळाली आहे. त्यानुसार सध्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील ५ डॉक्टर रडारवर असून, त्यांच्या कागदपत्रांची आणि पदव्यांची गुप्तपणे पडताळणी सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळताच पोलिसांच्या मदतीने छापा टाकण्यात येणार असल्याचे संकेत आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नजर
जिल्हा आरोग्य विभागाने ‘बोगस’ डॉक्टरांची माहिती मिळावी यासाठी तालुका वैदयकिय अधिकाऱ्यांना चौकशीच्या सुचना दिल्या आहे. नागरिकांनीही संशयास्पद, बोगस डॉक्टरांबाबत आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या आहे. त्यामुळे आता तालुका वैदयकिय अधिकाऱ्यांची नजर या ‘मुन्नाभाई’ वर असणार आहे.
जिल्हयात गेल्या दोन महिन्यापुर्वीच तक्रारीवरून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती. जिल्हयातून अजून काही तक्रारी येत आहे. ज्यांच्या तक्रारी आल्या आहे त्याची माहिती वैदयकिय अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.
डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
















