जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना शिंद गट व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये रविवारी दुपारी महायुती संदर्भात चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे नेते ना. गुलाबराव पाटील यांनी २५ जागांची मागणी केली असून भाजपाकडून १९ जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आलेली आहे मात्र, ते शिवसेनेला मान्य नसल्यामुळे ना. गुलाबराव यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे जागा वाटपाची चर्चा निष्फळ ठरल्याचे दिसून येत असून महायुतीची बोलणी फिस्कटल्याचे दिसून येत आहे.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असतांना अजूनही शिवसेना शिंदे गट व भाजपाकडून जागा वाटपाचा फॉर्मूलावर रविवारी रात्री उशिरापर्यंत शिक्कामोर्तब झालेला नाही, त्यामुळे युती होईल किंवा नाही, तुर्त सांगता येणार नाही, गेल्या पंचवार्षिकच्या निवडणुकीत देखील भाजपाकडून शिवसेना व भाजपाची युती होईल, महापालिकेची निवडणूक युतीतच लढवली जाईल, असे ना. गिरीष महाजन यांच्याकडून सांगण्यात येत होते. मात्र, अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीला दोन दिवस शिल्लक असतांना युती तोडण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते गाफिल राहिल्याने अवघ्या १५ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले होते तर, भाजपाला तब्बल ५७ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे तोच फंडा पुन्हा राबविण्यात येणार की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
ना. पाटलांनी बैठकीतून घेतला काढता पाय रविवारी दुपारी शहरातील अजिंठा विश्राम गृहात भाजपाचे मंत्री गिरीष महाजन, आ. मंगेश चव्हाण, आ. राजुमामा भोळे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा झाली. परंतु यावेळी शिवसेनेची २५ जागांची मागणी असतांना भाजपाने १९ जागांच्यावर जागा देण्यास नकार दिल्यामुळे ना. गुलाबराव पाटील यांनी १५ मिनिटातच बैठक सोडून काढता पाय घेतला. त्यामुळे शिवसेना शिंदे गट व भाजपातील युतीची बोलणी फिस्कटल्याचे दिसून येत आहे. मात्र, ना. गुलाबराव पाटील यांच्याशी पुन्हा चर्चा करून निर्णय घेवू अशी प्रतिक्रिया ना. गिरीष महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.















