मुंबई (वृत्तसंस्था) संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्या रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु झाले असून संजय राठोड यांची जागा आता मला द्या, अशी मागणी बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. त्यासाठी हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहले आहे.
हरिभाऊ राठोड यांनी सात मार्चला आणि ११ मार्चला अशी दोन पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहली आहेत. बंजारा समाजाची सेनेला गरज आहे, मी आपली आमदारकी तुम्हाला मुख्यमंत्री बनवायला धोक्यात आणली असून मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रीपद मिळालं असतं असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
काय आहे पत्रातील मजकूर ?
आपण विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना निवडूण आणण्यासाठी काम केल्याचं सांगून आपला संपर्क आणि काम प्रत्येक जिल्ह्यात असल्याचा उल्लेख हरिभाऊ राठोड यांनी केलाय. आपण भटक्या विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व केल्यासं सांगत हरिभाऊंनी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली तर त्याचा फायदा शिवसेनेला संपूर्ण राज्यात होईल असं सांगितलंय. आपण शिवसेनेमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याचं सांगत सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची आठवणही हरिभाऊ राठोड यांनी करुन दिली आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण मोठा त्याग केला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पहिल्या पत्रात उद्धव ठाकरे ह्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण किती प्रयत्न आपण केले हे सांगत १० मिनिटे वन टू वन चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. संजय राठोड प्रकरणामुळे राजकीय परिस्थिती बदलली असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. शिवसेनेला नंबर एकचा पक्ष बनवायचं आहे म्हणून सुद्धा ही वेळ मागितली आहे, असंही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय.
वनमंत्रिपदासाठी कोण-कोण शर्यतीत?
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतरच महाविकासआघाडीत लगेचच वनमंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग सुरु झाले होते. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील त्याच मंत्र्याकडे जाईल. मंत्रिमंडळ विस्तारात वनमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्याचं नाव निश्चित करतील, त्यालाच वनमंत्री पदाची लॉटरी लागेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, वनमंत्रिपद मिळावं यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचं कळत आहे. तर मुंबई-ठाण्यातील आमदारही वनमंत्रीपद मिळेल का यासाठी प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यामध्ये आमदार रवींद्र वायकर यांचे नाव आघाडीवर आहे.

















