भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील आयान कॉलनी परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या भयंकर घटनेत जावयाने आपल्या पत्नीच्या मामावर चाकू हल्ला करून त्याचा खून केला.
ही घटना शुक्रवारी (दि.१२ सप्टेंबर) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मामा समद इस्माईल कुरेशी (वय ३५) यांचा मृत्यू झाला असून, सासरे शेख जमिल शेख शकुर हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपी सुभान शेख यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुभान शेख आणि त्याची पत्नी यांच्यात गेल्या काही काळापासून सतत वाद होत होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. संतप्त झालेली पत्नी घर सोडून जळगावजवळील कंडारी येथे आपल्या मामाकडे गेली. त्यानंतर तिचे वडील आणि मामा समजूत घालण्यासाठी भुसावळमध्ये सुभान शेखच्या घरी आले. रागाच्या भरात सुभानने सासऱ्यावर हात उगारणे सुरू केले. त्यानंतर त्याने मामा समद ईस्माईल यांच्यावर चाकूने छातीवर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सासरे शेख जमिल यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी सुभान शेख यास ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असून, आरोपीच्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत चौकशी केली जात आहे.
















