जळगाव (प्रतिनिधी) ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यानंतर सूट मिळवून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या बँक ऑफ बडोदाच्या वसुली अधिकाऱ्याला पुण्याच्या सीबीआय पथकाने १९ जानेवारी रोजी रंगेहाथ अटक केली होती. आज या अधिकाऱ्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
या संदर्भात अधिक असे की, लोंढे (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी सुभाष काशिनाथ राणे (वय ६८) यांनी २०१० मध्ये चाळीसगावातील देना बँकेच्या शाखेतून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कालांतराने देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले. दरम्यान, काही कारणास्तव राणे यांनी बँकेचे हप्ते भरले नव्हते. त्यामुळे त्यांची बँकेच्या दप्तरी थकबाकीदार म्हणून नोंद झाली. दहा वर्षांनंतर म्हणजेच ८ जानेवारी २०२१ रोजी वसुली अधिकारी प्रशांत विनायक साबळे (वय ४२, रा. औरंगाबाद) याने शेतकऱ्याच्या घरी जाऊन कर्जाचा एकही हप्ता न फेडल्यामुळे व्याजासह १२ लाख रुपये झाल्याची माहिती दिली. तसेच थकबाकी न भरल्यास ट्रॅक्टर जप्त करण्याचा इशारा देत कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची लाच साबळेने मागितली. त्यावेळी शेतकऱ्याने त्याला १० हजार रुपये दिले. यानंतर १२ जानेवारी रोजी पुन्हा येऊन शेतकऱ्याकडे १० हजार रुपये मागितले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने १२ लाखांचे कर्ज केवळ ५ लाख ४० हजार रुपये करून देण्यासाठी पुन्हा २० हजार रुपये मागितले. त्यामुळे शेतकरी राणे यांनी एसीबी, सीबीआयकडे साबळेंची तक्रार केली. त्यानंतर पुणे येथील सीबीआयचे पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी तक्रारीची पडताळणी केली. खात्री पटल्यानंतर १९ जानेवारीला रात्री साबळे याला २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी साबळेला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आज साबळेला न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांनतर साबळेने जामीन अर्ज केला, त्यावर सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी हरकत घेतली. परंतु साबळे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला.