चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांच्यासह एका अभ्यासगटाने नुकतीच अहमदाबाद येथील सायन्स सेंटरला भेट दिली. या अभ्यासदौ-यात त्यांनी अहमदाबाद सायन्स सेंटर मधील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेत माहितीही जाणून घेतली. पाटणादेवी येथे आ. चव्हाण यांच्याच प्रयत्नातून राष्ट्रीय पातळीवरील ‘थोर गणितीतज्ञ भास्कराचार्य इनोव्हेटिव सेंटर’ उभारण्यात येत असून त्यासाठीचं सायन्स सेंटरचा अभ्यास दौरा करण्यात आला. अलिकडेचं मुंबई भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यभरातील आमदारांना नाविन्यपूर्ण स्थळांना भेटी देऊन आपापल्या मतदार संघातही अशा स्वरुपाचे उपक्रम, उभारणी करण्याचे आवाहन केले होते. यानंतर अवघ्या चारच दिवसात आ. चव्हाण यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सायन्स सेंटरचा अभ्यासदौरा पूर्ण केला. पंतप्रधानांच्या आवाहनाला ताकाळ प्रतिसाद देणारे ते राज्यातील पहिले आमदार ठरले आहेत.
चाळीसगाव शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर नैऋत्येला पाटणादेवीचा निसर्गरम्य परिसर असून येथेचं गणितीतज्ञ भास्कराचार्य यांनी गणितावरील अनेकविध मौलिक ग्रंथ साकारले. विशेष म्हणजे यादरम्यान त्यांनी खगोल व पर्यावरणाचाही पथदर्शी अभ्यास केला. आपल्या ग्रंथांमध्ये त्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. शून्याची संकल्पना मांडल्याने त्यांच्या अभुतपूर्व संशोधनाची राष्ट्रीयचं नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली. आजही त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी देश – विदेशातील अभ्यासकांना ओढ आहे. पाटणादेवी येथे त्यांनी खगोलशास्राचाही अभ्यास केला. त्यांचे नातू चंगदेव यांनी भास्कराचार्य यांच्या वंशावळीचा शिलालेख कोरुन ठेवला आहे. हा शिलालेख पाटणादेवी येथे उपलब्ध असून १८६१ मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांनी पाटणादेवी मंदिराला भेट देऊन शिलालेख शोधला. याशिलालेखामुळे भास्कराचार्य हे बाराव्या शतकात होऊन गेले, ते यापरिसरात वास्तव्यास होते. याची माहिती प्रथमचं समोर आली. भास्कराचार्य यांच्या याचं स्मृती जपण्यासाठी आ. चव्हाण यांनी पाटणादेवी येथे इनोव्हेटिव सेंटर उभारण्याचा संकल्प केला आहे.
सायन्स सेंटरचे महाव्यवस्थापक भारावले
अहमदाबाद येथील सायन्स सेंटरचे महाव्यवस्थापक डॉ. व्रजेश पारीख यांनी आ. मंगेश चव्हाण यांच्या अभ्यासगटाचे स्वागत केले. चाळीसगावसारख्या ग्रामीण भागातून आपल्या मतदार संघात नाविन्यपूर्ण व समाजपयोगी, विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविणा-या आ. मंगेश चव्हाण यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वानेही डॉ. पारिख प्रभावित झाले. त्यांनी सायन्स सेंटर मधील अद्ययावत माॕडेल, उपक्रमांसह विविध दालनांची माहिती यावेळी अभ्यासगटाला दिली. विशेष म्हणजे चार तास ते याअभ्यासगटासोबतचं होते. यावेळी सायन्स सेंटरमधील विविध स्थळांना अभ्यासगटाने भेटी दिल्या. भास्कराचार्य इनोव्हेटिव सेंटरविषयी देखील डॉ. पारिख व सायन्स सेंटरमधील अन्य तज्ञांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. डाॕ. पारिख यांनी भास्कराचार्य इनोव्हेटिव सेंटरच्या उभारणीत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासित केले. यावेळी येथील मिडिया विभागाने आ. चव्हाण यांची प्रतिक्रिया देखील चित्रीत केली. गांधीनगर येथील दांडी कुटीर यासोबतचं साबरमती नदी संवर्धन व सुशोभिकरण प्रकल्प, अटलसेतू, फुलांचा बगिचा येथेही अभ्यासगटाने भेटी दिल्या.
अभ्यासगटात यांचा होता समावेश
आ. मंगेश चव्हाण यांच्यासोबत छत्रपती संभाजी नगर येथील खगोल शास्त्रज्ञ व एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे प्रमुख श्रीनिवास औंधकर, जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, सर जे.जे. स्कूल आॕफ आर्टच्या ड्राईंग व पेटींग विभागातील प्रा. डॉ. विजय सकपाल, मुंबई येथील संशोधक, लेखिका व इतिहासकार स्नेहल तांबुलवाडीकर – खेडकर, मुंबईस्थित वास्तूरचनाकार धवल मलेशा, नाशिक येथील संरचनात्मक अभियंता अतुल अडावदकर, चाळीसगाव येथील सामाजिक व सांस्कृतिक विषयाचे लेखक जिजाबराव वाघ आदिंचा समावेश होता.
पंतप्रधानांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देणारे – आ. चव्हाण
मुंबई येथे काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राज्यातील आमदारांना पंतप्रधान यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यात त्यांनी आमदारांना बडेजाव न मिरवता साधेपणाने लोकांमध्ये वावरण्याचा सल्ला दिला. मतदारसंघाचा सर्वंकष विकास करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचे सूचित केले. देशभरात प्रेरणा देणारी विविध स्थळे आहेत. त्यांनाही भेटी देण्याचे आवाहन केले होते. याला तात्काळ प्रतिसाद देऊन आ. चव्हाण यांनी अभ्यासगटासोबत अहमदाबाद येथील सायन्स सेंटरला त्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशीचं भेट दिली. यामुळे राज्यभरातील आमदारांच्या वर्तुळातूनही त्यांच्या व्यासंगी व सर्जनशील व्यक्तिमत्वाचे कौतुक होत आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला कृतीयुक्त प्रतिसाद देणारे आ. चव्हाण हे राज्यभरातील पहिले आमदार ठरले आहेत.
पाटणादेवी परिसर जागतिक पातळीवर
गणितीतज्ञ भास्कराचार्य इनोव्हेटिव सेंटरच्या उभारणीमुळे पाटणादेवी परिसर जागतिक पातळीवर आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. अभ्यासकांना येथे भास्कराचार्य यांचे जीवनदर्शन घडेल. इनोव्हेटिव सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आ. चव्हाण यांनी राज्य शासनाकडे सादर केला होता. अहमदाबादच्या सायन्स सेंटरमधील गणितासह विकसित केलेले काही अत्याधुनिक माॕडेल, मनोरंजनात्मक खेळ आणि भास्कराचार्य यांचे जीवनदर्शन इनोव्हेटिव केंद्रात साकारले जाणार आहे. यासाठी आ. चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून राज्य शासनाने २० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. भास्कराचार्य यांच्या जन्मापासून ते त्यांचे गणितातील अतुलनीय योगदान, खगोल क्षेत्रातील त्यांची अभ्यासपूर्ण संशोधने यांचा आढावा मॉडेलच्या रुपात साकारण्यात येईल. यामुळे यापरिसरातील पर्यटनाला मोठी चालनाही मिळेल.
इनफो
चाळीसगाव परिसराला मोठी पौराणिक, ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी आहे. गणितीतज्ञ भास्कराचार्य यांच्या रुपाने हा वारासा जागतिक पातळीपर्यंत पोहचला आहे. भास्कराचार्य यांच्याविषयी अभ्यासकांना नेहमीच कुतुहल वाटते. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची ओढ असते. पाटणादेवी येथे भास्कराचार्य इनोव्हेशन सेंटर याचं उद्दात्त भावनेतून साकारत आहोत. यामुळे मोठा ऐतिहासिक पट उलगडला जाणार आहे. वैदिक ते आधुनिक गणित असे दोन टोक येथे जोडले जातील. मनोरंजनात्मक खेळही असतील. याचा थेट फायदा पर्यटन वाढीला होईल. यासाठीचं अहमदाबाद सायन्स सेंटरला अभ्यासभेट दिली. भेटीमुळे प्रेरणा मिळाली. इनोव्हेशन सेंटर उभारणीची दिशाही स्पष्ट झाली. इनोव्हेटिव सेंटरमुळे स्थानिक रोजगार निर्माण होऊन बचत गटातील महिलांनाही व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. याअभ्यास गटाच्या अजून काही बैठका घेण्यात येतील.
– आ. मंगेश चव्हाण, चाळीसगाव