जळगाव (प्रतिनिधी) जळगावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या कारखान्यात मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे शीतपेय तयार करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या कारखान्यात बनावट देशी दारू तयार केली जात असताना कारवाई करण्यात आली. पथकाने 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत पाच संशयीतांना शनिवारी ताब्यात घेतले.
जळगावच्या औद्योगिक वसाहत परिसरातल्या के.सेक्टरमध्ये मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट या नावाने असलेल्या कंपनीत विविध फ्लेवर्सचे शीतपेय तयार करण्यात येत असल्याचे चित्र दर्शवण्यात आले मात्र प्रत्यक्षात येथे टँगो संत्रा या ब्रँडची बनावट देशी दारू तयार करण्यात येत होती. यासाठी येथे रसायनांपासून ते पॅकेजींगची सर्व सामग्री तैनात होती.
ही माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाला मिळताच खातरजमा केल्याने शनिवारी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सकाळी मंदार आयुर्वेदीक प्रॉडक्ट या कंपनीवर छापा टाकण्यात आला. यात येथे बनावट दारू तयार करणारी सर्व यंत्रणा तसेच सामग्री आढळून आली. यात तब्बल 50 लक्ष 59 हजार रूपयांची सामग्री जप्त करण्यात आली असून हा आकडा वाढणार असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरूध्द कार्यवाही सुरू झालेली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कंपनीला भेट देऊन या कार्यवाहीबाबतची माहिती जाणून घेतली.