जळगाव (प्रतिनिधी) लग्नासाठी १ लाख ७० हजार रुपये घेऊन १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आई, वडील, बहीण, आत्या, मध्यस्थी महिला, एक तृतीयपंथीय यांच्यासह मुलीच्या पतीविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तरुणाने लग्नासाठी दिलेले १ लाख ७० हजार रुपये तर गेलेच शिवाय पोक्सो कलमासह बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नासाठी मुलीचे आई-वडील व इतरांनी दोन तरुणांकडून प्रत्येकी एक लाख ७० हजार रुपये घेऊन दोन्ही मुलींचे लग्न लावून दिले होते व नंतर मुलींना न पाठविता फसवणूक केली होती. यात तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही नववधूंसह त्यांचे आई-वडील, मध्यस्थी महिला व एका तृतीयापंथीयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये पहिल्या मुलीचे १ लाख ७० हजार रुपये घेऊन लग्न लावले त्या वेळी संबंधित वराने त्याचा मित्रही वधू शोधत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पहिल्या मुलीच्या बहिणीचे लग्न लावून दिले होते. त्याबदल्यातही १ लाख ७० हजार रुपये घेतले होते.
शारिरीक संबंध ठेवल्यामुळे पतीविरुद्ध गुन्हा
पैसे घेऊन ज्या मुलीचे नंतर लग्न लावून दिले ती अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. आई, वडील, बहीण, आत्या, मध्यस्थी महिला व एक तृतीयपंथीय यांनी सदर मुलगी १८ वर्षांची असल्याचे उपवराला सांगितले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच लग्नानंतर ही मुलगी १८ वर्षांची असल्याबाबत खात्री न करता तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याने तरुणाविरुद्धही तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















