जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांसाठी पाठविल्या जाणार्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटची जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी पाहणी करून त्यांच्या पॅकिंगसंदर्भात संबंधितांना मार्गदर्शन केले.
ढगफुटीमुळे विविध नदी-नाल्यांना पूर येऊन चाळीसगावसह तालुक्यातील जवळपास २० ते २५ गावांना त्याचा फटका बसला. यात अनेकांच्या घरांसह विविध व्यावसायिक दालनांत पुराचे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊन त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली. या आपत्तीग्रस्त कुटुंबांकरिता सामाजिक दातृत्व निभावत आपले कर्तव्य समजून जळगाव शिवसेनेने शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, तसेच संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींना हाक दिली. या हाकेला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत विविध संसारोपयोगी वस्तू सस्नेह देण्यासाठी अनेकजण सरसावले. यामध्ये एका कुटुंबाला साधारणपणे १५ ते ३० दिवस पुरेल एवढ्या संसारोपयोगी वस्तूंचे किट तयार करण्यात आले असून, ते ५१० कुटुंबांना वितरीत केले जातील.
या किटची जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी पाहणी करून त्यांच्या पॅकिंगसंदर्भात संबंधितांना मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी शिवसेनेच्या नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शिवसैनिक विराज कावडिया, अमित जगताप, प्रितम शिंदे, उमाकांत जाधव, पीयूष हासवाल व त्यांचे सहकारी उपस्थित होते. एकूण तीस युवकांच्या टीमने या ५१० किट पॅकिंगच्या कामासाठी परिश्रम घेतले. हा उपक्रम यशस्वितेसाठी जळगाव शहरातील शिवसैनिकांचा मोलाचा वाटा आहे.