पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात ७ जूनपासून पावसाला सुरुवात होईल आणि १० ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहील, असे भाकीत प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविले आहे. पाचोरा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, यावर्षी जोरदार पाऊस होणार असून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. मात्र शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पेरणी केल्यास व रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास भरघोस उत्पन्न मिळू शकेल. यावर्षी पूर्वेकडून पाऊस असल्याने मोसमी वारे वेळेवर येत आहेत व भरपूर प्रमाणात पाऊस पडून भरघोस उत्पन्न येण्याची शाश्वती आहे. पिकांना चांगल्या प्रकारे भाव राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये निसर्गाची अवकृपा झाली तरीही घाबरू नये.
तापमान वाढीचे परिणाम
यावर्षी तापमान जास्त वाढल्याने पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे. कोणत्याही प्रकारचा खंड पावसात पडणार नाही. योग्य वेळी पर्जन्यवृष्टी होईल. तापमान वाढीचा परिणाम पावसावर होऊन बऱ्याच वेळेस धो-धो पाऊस सुरू राहील, अशी माहितीही देऊन ते पुढे म्हणाले, १० ऑक्टोंबरपर्यंत पाऊस राहील. त्यानंतर थंडीचे वातावरण सुरू होईल. उपग्रहांच्या अभ्यासाद्वारे आपण ऊन, वारा, पाऊस, गारपीट आणि वीज कोसळणे यावर भाकित करीत असल्याचे ते म्हणाले.
लाल तांबडे आकाश झाले, तर तीन दिवसात पाऊस
पावसाचे प्रमाण कसे राहील व पाऊस कधी पडेल? यावर ते म्हणाले की, निसर्गात काही वेगळे चमत्कार व अंदाज असतात त्यानुसार हे भाकीत केले जाते. यात सूर्य मावळतीला पश्चिमेकडे लाल तांबड़े आकाश झाले तर तीन दिवसात पाऊस पडेल तसेच विजेच्या दिव्याभोवती किडे पाकळ्या आल्यास पाऊस पडतो, झाडावर बसलेल्या चिमण्या या धुळीने आंघोळ करीत असल्यास तेव्हा पाऊस येतो, विमानाचा आवाज मोठा आल्यास पाऊस पडण्याचे लक्षात येते, चिंचेच्या झाडाला जास्त प्रमाणात चिचा लागल्या त्यावर्षी जोरात पाऊस पडतो, असे ठोकताळे असल्याचे ते म्हणाले.