धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पालिकेची निवडणूक ‘एमआयएम’ लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा वृत्ताला दोन माजी नगरसेवकांनी ‘द क्लिअर न्यूज’कडे दुजोराला दिला आहे.
या संदर्भात अधिक असे की, धरणगाव पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. तशातच मागील काही महिन्यांपासून ‘एमआयएम’ धरणगावच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. परंतू यावर अधिकृत बोलायला कुणीही तयार नव्हते. परंतू आता धरणगाव पालिकेची निवडणूक ‘एमआयएम’ लढण्याची शक्यता वाढली असल्याचे बोलले जात आहे. कारण एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे येत्या काही दिवसात औरंगाबाद येथे सभे निमित्त येणार आहेत. याचठिकाणी धरणगावहून काही जण त्यांची भेट घेणार असल्याचे कळते. औरंगाबादला भेट घेतल्यानंतरच धरणगाव पालिकेच्या रिंगणात ‘एमआयएम’ भाग घेणार की, नाही? यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेणार असल्याच्या वृत्ताला नाव न सांगण्याच्या अटीवर दोन माजी नगरसेवकांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, पालिकेच्या प्रभाग रचनेत मुस्लीम समाजाची मते मुद्दाम विखुरण्यात आल्याच्या आरोपानंतर पालिकेच्या राजकाणात ‘एमआयएम’ उतरल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता अधिक आहे.