मुंबई (वृत्तसंस्था) दादर आणि ठाण्यात आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच असा इशारा दिल्यानंतर मनसेनं नियम झुगारत अखेर दहिहंडी फोडलीच. ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मध्यरात्री कोरोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली आहे. मनसेतर्फे दहीडंडी फोडत राज्य सरकारच्या निर्बंधांचा निषेध करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची नुकतीच बैठक घेतली. कोरोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यासह, मुंबईत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी उभारली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.
ठाण्यात दहिहंडी साजरी करू दिली नाही तर दादरमध्ये करू, असे मनसेचे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते. दहीहंडी साजरी करण्यावरून ठाण्याचे मनसे प्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देशपांडे यांनी ही भूमिका घेतली होती. त्यानंतर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे दहीडंडी फोडत राज्य सरकारच्या निर्बंधांचा निषेध करण्यात आला. तर सरकारच्या अटीला झुगारून मनसेने घाटकोपर येथील भटवाडी येथे राजू सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोपाळकाला साजरा करण्यात आला.
















