धरणगाव (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयात मंगळवारी शेवटच्या दिवशी १४-जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आमदार मुकुंदा आनंदा रोटे यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांच्याकडे दाखल केला.
तत्पूर्वी श्री. बालाजी भगवान मंदिरात दर्शन घेतले. तद्नंतर बालाजी मंदिर येथून धरणी बाजार, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, मेनरोड, कोट बाजार, लालबहादूर शास्त्री स्मारक, परीहार चौक, सुभाष दरवाजा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तेथून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले उड्डाणपुलावरून तहसील कार्यालय पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्याकडून जाहीर झालेल्या उमेदवारी यादीमध्ये जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मुकुंदा आनंदा रोटे यांना संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस असल्याने मुकुंदा रोटे व मनसे सैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला अर्ज दाखल केला आहे. एकीकडे ढोल ताशांचा गजर साथीला ॲड. जयप्रकाश बाविस्कर आणि कोण आला रे कोण आला, मुकुंदा भाऊ आगे बढो, मनसेना झिंदाबाद आदी घोषणांच्या निनादामध्ये उमेदवार रोटे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
अर्ज दाखल झाल्यानंतर आभारसभेत उमेदवार मुकुंदा रोटे यांनी आपण घेतलेली उमेदवारी ही मतदार संघात विकासाच्या दृष्टीने असल्याचे सांगितले. यांनतर ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, परिवर्तन झाल्याशिवाय जळगाव ग्रामीणचा विकास होणार नाही, यादृष्टीने पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांचे शासन आणण्यासाठी मुकुंदा रोटे यांना विजयी करण्याचे आवाहन ॲड. बावीस्कर यांनी केले. आभारसभेचे प्रास्ताविक राजू बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन रवी महाजन यांनी तर संदीप फुलझाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी माजी आमदार ॲड.जयप्रकाश बाविस्कर, जळगांव शहर जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, जळगाव महानगराध्यक्ष विनोद शिंदे, जनहिचे राजेंद्र निकम, तालुकाध्यक्ष हेमंत महाजन, ता. सचिव राजु बाविस्कर, उपाध्यक्ष कृष्णा पाटील, शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, चित्रपट सेनेचे समाधान माळी, शाखाध्यक्ष गोकुळ मराठे, मोहन महाजन, पंकज चौधरी यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.