बंगळुरू (वृत्तसंस्था) कर्नाटकातील कुलबुर्गी येथील एका पीडब्ल्यूडी विभागाच्या अभियंत्याच्या घरात छापा टाकण्यात आला. या छाप्यात अधिकाऱ्यांनी घरातील पाईप कापल्यानंतर त्यात मोठं घबाड आढळून आलं. पाईपमधून पाण्याऐवजी नोटा निघू लागल्याने अधिकारीही चक्रावून गेले. कर्नाटकात एसीबीने बुधवारी ही कारवाई करत अभियंत्याच्या घरातून ५५ लाख रुपये रोख जप्त केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी कर्नाटक राज्यात ६८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. घराच्या छतावर आणि ड्रेनेज पाईप्सवर ठेवलेले ५० लाख रुपयांपेक्षा जास्त नोटांचे बंडल एसीबी अधिकाऱ्यांनी यावेळी जप्त केले. एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साड्यांमध्येही नोटा लपविल्या गेल्या होत्या. अधिकाऱ्यांनी कलबुर्गी येथील कनिष्ठ अभियंता शांता गौरा बिरदार यांच्या निवासस्थानावर छापा टाकला, ज्यामध्ये बाथरूमला लागून असलेल्या घराच्या ड्रेनेज पाईपमध्ये १३.५० लाख रुपयांच्या चलनी नोटांचे बंडल सापडले. त्यांच्याकडून घराच्या छतावरून १५ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. या कनिष्ठ अभियंत्याच्या घरातून एकूण ५५ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ड्रेनेज पाईपमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कर्नाटकातील कुलबुर्गी येथील एका पीडब्ल्यूडी विभागाच्या अभियंत्याच्या घरावर छापा टाकला होता. लाचखोर अभियंत्याने घरातील ड्रेनेज पाईपमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल लपवले होते. कारवाई दरम्यान पाईपमधून नोटा बाहेर पडू लागल्यावर तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. अधिकाऱ्यांनी पाईपमधून नोटा गोळा करण्यासाठी त्याखाली बादली धरली होती. नोटा इतक्या होत्या की बादल्या भरल्या, पण नोटा संपल्या नाहीत. अहवालानुसार, आरोपी अभियंत्याच्या घरातून ५५ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानाच्या पाईपलाईनमध्ये रोख रक्कम लपवण्यात आल्याचे सूत्रांकडून एसीबी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी छापा टाकून एका प्लंबरला बोलावून पाइपलाइन उघडली आणि आत लपवलेल्या नोटा बाहेर काढल्या. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये अधिकारी आणि प्लंबर पाईपचे काही भाग वेगळे करताना दिसत आहेत. या पाईप्समधून पुन्हा नोटा काढण्यात आल्या.