जळगाव (प्रतिनिधी) एटीएमच्या रांगेत उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने पैसे काढण्यास मदत करतो, सांगत शेतकऱ्याजवळील एटीएमकार्ड अदलाबदल करुन त्यांच्या बँक खात्यातून पैसे परस्पर काढून घेतले. ही घटना दि. ८ रोजी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे पुंडलिक रामचंद्र मराठे हे वास्तव्यास असून ते शेती करतात. आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी ते शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएम मशीन कॅबीनमध्ये आले. याठिकाणी एका अनोळखी इसमाने त्यांच्याशी संवाद साधत त्यांना बोलण्यात गुंतविले. हातचलाखी करत त्याने शेतकऱ्याचे एटीएम कार्डाची अदलाबदल केली. त्यांनतर त्याने दोन वेळा या कार्डचा वापर करत सुमारे १७ हजार रुपयांची रोकड काढत फसवणूक केली. प्रकार लक्षात येताच शेतकऱ्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जावुन कैफियत मांडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार प्रदीप पाटील हे तपास करीत आहेत.
















