वर्धा (वृत्तसंस्था) झोपेत असलेल्या बालकाला विषारी सापाने दंश केला. त्यानंतर उपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची वार्ता गावात येतात संपूर्ण गावशोकसागरात बुडाले. ही घटना बोरखेडी नजीकच्या बोटोणा येथे घडली.
नक्ष प्रफुल्ल ठाकरे (९) असे मृत बालकाचे नाव आहे. नक्ष हा बोटोणा गावातील जिल्हा परिषद शाळेतील तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता. नक्षचे वडील खाजगी वाहनावर चालक आहे. आई शेतमजूरी करते. परिवारातील सर्व सदस्य जेवण करून झोपी गेले.
शुक्रवार, ४ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजता नक्ष अचानक झोपेतून उठला.
डोक्याला काहीतरी लागले आहे म्हणून डोक दुःखात आहे, असे त्याने आईला सांगितले. आईने त्याला पाहीले आणि काही लागले नाही म्हणून झोप, अशी गळ घातली. त्यानंतर लगेच नक्षच्या छातीत दुःखायला लागले. लगेच खाजगी वाहनाने त्याला कारंजा ग्रामीण रुग्णालयात येथे नेले. डॉ. डाखोळे यांनी त्याला मृत घोषीत केले. त्यानंतर नक्षवर अंत्यविधी पार पडला.
यानंतर घरातील साप गेला कुठे हे शोधायला सुरूवात झाली. शोध सुरु असताना फना काढून साप कोपऱ्यात होता. त्याला पकडण्याकरिता सर्पमित्र गणेश काळे कारंजा यांना बोलविले. सोबत तळेगावचे सर्पमित्र हर्षवर्धन बन्नगरे यांनाही बोलविले. बोटोणा गावातील वनरक्षक के. डी. सोडगीर यांच्या उपस्थितीत सापाला पकडण्यात आले. नक्षच्या मृत्यूने बोटोणा गावात हळहळ व्यक्त होत आहे. नक्ष हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.