नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लहान मुलांना आपात्कालीन सेवेची माहिती देणं किती फायदेशीर होऊ शकतं, याचं एक चांगलं उदाहरण सूरतमध्ये (Gujrat News) पाहायला मिळालं आहे. एका ७ वर्षांच्या मुलाने समजूतदारपणे आईचा जीव वाचवला. या मुलाच्या आईला हार्ट अटॅक (Heart Attack) आला होता आणि ती बेशुद्ध झाली होती. यानंतर मुलाने तातडीने १०८ वर कॉल करून रुग्णवाहिकेला बोलावलं. तातडीने उपचार मिळाल्यामुळे आईचा जीव वाचला.
आईला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ७ वर्षाच्या मुलाने घाबरून न जाता उचललेलं पाऊल पाहून डॉक्टरही चकीत झाले. त्यांनी मुलाचं भरभरून कौतुक केलं आहे. ७ वर्षाच्या मुलाला इतकी माहिती असणं ही फार मोठी गोष्ट आहे. जर १ तास जरी उशीर झाला असता तर महिलेचा जीव वाचला नसता. सध्या महिलेची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंजू पांडे असं या महिलेचं नाव आहे. बुधवारी मंजू आपल्या मुलासोबत घरामध्ये असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली.
हार्ट अॅटॅकमुळे आई झाली बेशुद्ध, चिमुकल्याने दाखवलं प्रसंगावधान
४० वर्षीय मंजू पांडे या उत्तर प्रदेशातील अयोध्याच्या रहिवासी आहेत पण आता त्या आपल्या पती मुलासह सूरतमध्ये राहत आहेत. राहुल असं सात वर्षीय मुलाचं नाव आहे. राहुलने दिलेल्या माहितीनुसार, एकदा माझ्या बहिणीने सांगितलं होतं की, कोणाचीही तब्येत बिघडली तर १०८ नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावता येते. त्यानुसार राहुलने कॉल करून रुग्णवाहिका बोलावली. आजारी मंजूने सांगितलं की, जेव्हा मला जाग आली तेव्हा मी रुग्णालयात होते.
केलं असं काही की वाचला जीव
बुधवारी दुपारी अचानक उलट्या सुरू झाल्या आणि अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर मंजू बेशुद्ध झाल्या. याच वेळी त्यांचा ७ वर्षाचा मुलगा राहुलने तातडीने १०८ वर फोन करून रुग्णवाहिका बोलावली. सिव्हीलमध्ये ऑन ड्यूटी मेडिकल ऑफिसरनी सांगितलं की, हा मुलगा खूप हुशार आहे. सर्वसाधारणपणे मुलं मोबाईलवर गेम खेळत असतात किंवा कार्टून पाहत असतात. मात्र या मुलाने मोबाईलचा योग्य वापर केला. त्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि आपल्या आईचा जीव वाचवला.