मुंबई (वृत्तसंस्था) रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपसोबत केलेल्या करारावर सिंगापूरमधील लवादने बंदी घातली आहे. रिलायन्स रिटेलने फ्यूचर ग्रुपचा व्यवसाय खरेदी केल्यानंतर जेफ बेजोस यांच्या अमेझॉन कंपनीच्या याचिकेवर लवादने हा निर्णय दिला आहे. यामुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला जोरदार फटका बसला आहे.
फ्यूचर ग्रुपने रिलायन्स रिटेलसोबत २४,७१३ कोटी रुपयात करार करुन आपल्या व्यवसायाची विक्री केली होती. परंतु फ्यूचर ग्रुपने रिलायन्ससोबत करार करुन, आपल्यासोबत मागील वर्षी केलेल्या कराराचं उल्लंघन केले आहे, असं सांगत अँमेझॉनने सिंगापूरमधील लवादात याचिका दाखल केली होती. यावर दिलेल्या अंतरिम आदेशात फ्यूचर ग्रुपला आपला व्यवसाय रिलायन्सला विकता येणार नाही. सध्या या करारावर बंदी घालण्यात आली आहे. अँमेझॉनने मागील वर्षी किशोर बियानी यांच्या फ्यूचर ग्रुपच्या कुपन्स लिमिटेड या कंपनीमधील ४९ टक्के भागीदारी खरेदी केली होती. याशिवाय फ्यूचर रिटेलमधील ७.३ टक्के वाटा देखील आहे. परंतु हा व्यवसाय किशोर बियानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज २४,७१३ कोटी रुपयात विकला. यानंतर अँमेझॉनने सिंगापूरच्या लवादकडे दाद मागितली होती.