जळगाव (प्रतिनिधी) येथील अजिंठा शासकीय विश्राम गृह येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत बहुजनवादी संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक प्रा. प्रितीलाल पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा गठित करण्यात आला असून जनक्रांती मोर्चाच्या राज्य अध्यक्षपदी आंबेडकरी आंदोलनाचे लढाऊ व संघर्षशील बहुजनवादी नेते मुकुंद सपकाळे यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीचे प्रास्ताविक हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले, तर मुकुंद सपकाळे यांच्या राज्यअध्यक्ष पदाचा प्रस्ताव अमोल कोल्हे यांनी मांडला. तर अनुमोदन श्रीकांत मोरे यांनी करून असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेत मुकुंद सपकाळे म्हणाले की, लोकशाहीवादी, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष, समाज निर्मिती साठी आणि सामाजिक परिवर्तनाचे आंदोलन गतिमान करण्याचा संकल्प व निर्धार व्यक्त करत दलित-शोषित-कष्टकरी-शेतकरी बहुजन समाजाच्या जनतेवर होणारा अन्याय-अत्याचार विरोधी जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न सतत करत राहील. सदर बैठकीत रमेश सोनवणे, संजय तांबे, माजी नगरसेवक राजू मोरे, बाबुराव वाघ इत्यादीने मनोगत व्यक्त केले. भारत सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, धर्मेश पालवे, दिलीप सपकाळे, वसंत पाटील, राजू पटेल, नाना मगरे, गौतम सोनवणे, समाधान सोनवणे, दादाराव शिरसाठ, संतोष भिल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.