मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात दररोज ३५ ते ४० हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल पूर्णपणे बंद होणार नाही. मात्र, लोकल प्रवासावर काही निर्बंध लादले जातील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढीचा आकडा दिवसाला ४० हजारांवर गेला आहे. त्यामुळं सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आणखी काय उपाययोजना करायच्या या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती दिली.
राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असला तरी लॉकडाऊनला विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही विरोध आहे. त्यामुळं संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय मागे पडला आहे. मात्र, निर्बंध अधिकाधिक कठोर करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत आहेत. गर्दी होणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळंच मुंबई लोकलबाबत सरकार काय निर्णय घेणार? लोकल पुन्हा बंद होणार का? याविषयी मुंबईकरांच्या मनात धाकधूक आहे.
विजय वडेट्टीवार यांनी आज याबाबत माहिती दिली. ‘मुंबईतील लोकल पूर्णपणे बंद होणार नाही. मात्र, लोकल प्रवासावर काही निर्बंध लादले जातील. लोकल प्रवासाचं नियोजन वेगळ्या पद्धतीनं केलं जाईल. गर्दी नियंत्रणात ठेवतानाच लोकांची गैरसोय होणार नाही हे पाहिलं जाईल. मागील वेळी पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये अशा प्रकारचे नियोजन करण्यात आलं होतं, असंही ते म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
‘कोरोनाची आताची स्थिती भयंकर आहे. कोरोनाबाधितांमध्ये यावेळी २५ वर्षे वयाच्या आतील रुग्णांची संख्या जास्त आहे. लहान मुलांपर्यंत कोरोना पोहोचलाय. सरकारकडून उपाययोजना सुरूच आहेत,’ असंही वडेट्टीवार म्हणाले.
प्रवाशांची संख्या घटली
“लोकल रेल्वेत कोणतेही नवीन निर्बंध किंवा फेऱ्या कमी करण्यासंदर्भात राज्य किंवा केंद्र सरकारचे अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करू,” पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. फेब्रुवारीत पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण १८ लाख एवढी होती. ती आता कमी होऊन १५-१६ लाखांवर आली आहे.