जळगव प्रतिनिधी । राज्य शासनातर्फे महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. या योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच कोविडच्या उच्चाटनासाठी राबविण्यात येत असलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान यशस्वी करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे (माविम) सहकार्य घ्यावे. असे निर्देश महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे (राज्यमंत्री दर्जा) यांनी दिले.
श्रीमती ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक अरुण प्रकाश, नाबर्डचे समन्वयक श्रीकांत झांबरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, ‘माविम’चे विभागीय मूल्यमापन अधिकारी संदीप मराठे, कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अनिसा तडवी, ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. पी. सी. शिरसाट, जिल्हा समन्वय अधिकारी शेख अतिक इकबाल, महानंदा पाटील यांच्यासह आयसीआयसीआय व सारस्वत बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीमती ठाकरे यांनी सांगितले की, महिला आर्थिक विकास महामंडळ ही महिलांसाठी कार्य करणारी शिखर संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1975 मध्ये झाली असून देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही ‘माविम’चे अध्यक्षपद भूषविले आहे. ‘माविम’च्या माध्यमातून राज्यात 431 लोकसंचलित साधन केंद्र चालविले जातात. प्रत्येक केंद्राशी 450 ते 500 महिला बचत गट जोडले गेले आहेत. या माध्यमातून 16 लाख महिला ‘माविम’शी जोडल्या गेल्या आहेत. ‘कोरोना’ काळात या महिलांनी प्रत्येकी एक रुपयाप्रमाणे 11 लाख 35 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला होता. या कालावधीत महिलांनी चार कोटी रुपयांच्या मास्कचे वाटप करुन स्वयंसहाय्य नाही तर समाजसहाय्यचे काम केले आहे. त्याचबरोबर धान्य बँकेच्या धर्तीवर व्हेजिटेबल बँक सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी महिलांसाठी असलेल्या विविध योजना ‘माविम’च्या माध्यमातून राबवाव्यात. त्यामुळे महिलांसाठी असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील यावल तालुक्यात सुरु असलेल्या मनोकामना, जामनेर व एरंडोल तालुक्यातील स्वप्नपूर्ती, रावेर तालुक्यातील भरारी व उन्नती आणि चोपडा तालुक्यातील प्रेरणा या संस्थामार्फत सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती देतांनाच महिला आपल्या हिमतीवर स्वावलंबी झाल्या पाहिजे याकरीता समाज सहभागाबरोबरच अधिकाऱ्यांचाही सहभाग महत्वाचे असल्याचे श्रीमती ठाकरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतानाच राज्य शासनाने मिशन बिगेन अगेन सुरू केले आहे. आता ‘माझी जबाबदारी- माझे कुटुंब’ही मोहीम सुरू केली आहे. अशा परिस्थितीत समाजाचे सक्षमीकरण होण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. ते करतानाच त्यांना स्वावलंबी करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसून येतील. जळगाव जिल्ह्यात ‘माविम’च्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी आढावा बैठका घेण्यात येईल. तसेच महिलांचे सक्षमीकरण झाले तरच जिल्ह्याचा विकास होईल ही बाब लक्षात घेऊन मविम ला सहकार्य करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले. तर ग्रामीण विकास यंत्रणेचे बचतगट व मविम चे बचतगटांना एकत्र उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विक्री केंद्र उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत महिलांसाठी असलेल्या योजनांची व त्यांचा प्रगतीची माहिती दिली. ‘माविम’चे जिल्हा समन्वयक शेख अतिक इकबात यांनी जिल्ह्यातील 13 तालुक्यात 185 गावात स्वयंसहाय्यता बचतगट निर्मितीचे काम सुरु आहे. सध्या जिल्ह्यात 1809 गट स्थापन करण्यात आले असून जिल्ह्यातील 14 नगरपालिका व एक महानगरपालिकेमध्ये 2723 असे एकूण 4532 बचत गट कार्यरत आहे. या गटांना 153 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या व येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी माविमच्या वार्षिक अहवालाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.