मुंबई (वृत्तसंस्था) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचं नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार केलं आहे. यावरून आता चांगलंच राजकारण पेटलेलं पाहायला मिळतंय. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं नामकरण करणे ही लोकभावना नसून हा तर राजकीय ‘खेळ’ म्हणावा लागेल, अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे.
“सध्या देशाचे वातावरण खेळमय झाले आहे. एरव्ही ते क्रिकेटमय झालेले दिसते. टोकियो ऑलिम्पिकमुळे देशात इतर खेळांवर उत्साहाने चर्चा होत असताना निरज चोप्रा याने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. या सुवर्ण क्षणाचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने राजकीय खेळ केला. या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. १९९१-९२ सालापासून राजीव गांधींच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय. अनेक महान खेळाडूंना आतापर्यंत हा पुरस्कार प्रदान केला गेला, पण राजीव गांधी यांचे नाव असलेला हा पुरस्कार नको असे यापैकी कोणीही म्हटल्याचे दिसत नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी हॉकी संघास ब्राँझ पदक मिळताच मोदी सरकारने राजीव गांधींचे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे नामकरण करणे हे अनाकलनीय आहे. मोदी सरकारचे म्हणणे आहे की, ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देणे ही लोकभावना आहे. श्री. अमित शहा म्हणतात, देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार महानतम खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. खेळ जगताशी जोडलेल्या प्रत्येकाची छाती त्यामुळे गर्वाने फुलली असेल. गृहमंत्री शहा यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. त्यांनी जे सांगितले व कृतीत उतरवले त्याबाबत वाद करण्यात अर्थ नाही. कारण गेल्या सत्तर वर्षांत काँग्रेसच्या सरकारने, नेहरू, गांधी, राव, मनमोहन, मोरारजी, देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर यांनी जे काही केले ते सर्व धुवून आणि पुसून टाकायचे, असे कुणाचे राष्ट्रीय धोरण किंवा राज्य चालवायची भूमिका असेल, तर कपाळ पह्डून उपयोग नाही. पण राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही हीसुद्धा एक लोकभावना आहे व त्या भावनेची दखल घ्यावीच लागेल,” असं शिवसेनेने सुनावलं आहे.
“मिल्खा सिंग, ध्यानचंद ही अशी नावे आहेत की, देशवासीयांना त्यांचे विस्मरण कधीच होणार नाही. आज मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केले. याचा अर्थ आधीच्या सरकारांना ध्यानचंद यांचे विस्मरण झाले होते असे नाही. १९५६ साली ध्यानचंद यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले. ३ डिसेंबर १९७९ रोजी या महान खेळाडूचे दिल्लीत निधन झाले. ध्यानचंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय खेळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान केले जातात. मेजर ध्यानचंद व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठेच आहे. ते एक उत्तम माणूस होते व पंडित नेहरूंशी त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱया राजीव गांधी यांचे नाव पुसून तेथे मेजर ध्यानचंद यांचे नाव लावणे हा ध्यानचंद यांचाही मोठा गौरव आहे, असे मानता येत नाही. राजीव गांधींचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेषाचे राजकारण आहे,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.
“ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे झाले असते तर मोदी सरकारची वाहवाच झाली असती. आता भाजपमधील राजकीय खिलाडी असे सांगत आहेत की, ‘राजीव गांधी यांनी कधी हातात हॉकीचा दांडा धरला होता काय?’ हा त्यांचा प्रश्न वाजवी आहे, पण अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदींच्या नावाने केले. मग श्री. मोदी यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी पार पाडली? किंवा अरुण जेटली यांच्या नावाने दिल्लीत स्टेडियमचे नामकरण केले. तेथेही तोच निकष लावता येईल, असा प्रश्न लोक विचारत आहेत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.