चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्वच्छता पंधरवडा अभियानांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी “स्वच्छता हीच खरी सेवा” या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण देशाची स्वच्छता करायला हवी. भारत रोगराई मुक्त करणे हे आपले सर्वांचे उद्दिष्ट असले पाहिजे. प्राथमिक स्तरावर आपला वर्ग स्वच्छ ठेवता आला पाहिजे. वर्गात खाऊचे, चॉकलेटचे रॅपर, टरफले आपण स्वतः उचलून कचरापेटीत टाकले पाहिजेत. विद्यार्थ्याने स्वच्छता मोहीम स्वतः पासूनच सुरु करुन राष्ट्र घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अधिसभा सदस्य, मीनाक्षी निकम, प्रा. सुनील निकम, उपप्राचार्य डॉ. जी.डी. देशमुख, डॉ. सौ.उज्वला नन्नवरे, डॉ. विजय लकवाल उपस्थित होते.
डॉ. सचिन नांद्रे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविताना फक्त स्वच्छतेच्या घोषणा देऊ नये. त्यांनी प्रत्यक्ष स्वच्छता करून दाखविण्याची कृती करावी. म्हणजे समाज आपले अनुकरण नक्कीच करेल आणि स्वच्छतेचा संदेश घरोघरी जाईल. तसेच बाजारात जाताना कापडी पिशवीचा जरूर वापर करावा, कॅरीबॅग घेणे टाळावे. लग्न समारंभ किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमांना जाताना आपण प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करतो आणि त्या तेथेच टाकून देतो. पाण्याची बाटली वापरून फेकून देतो तसे न करता नगरपालिकेच्या किंवा ग्रामपंचायतीच्या नियोजित केलेल्या कचरापेटीतच टाका. हे काम ग्रामपंचायतीचे किंवा नगरपालिकेचे नाही हे आपले प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असले पाहिजे.
चित्र पवार यांनी स्वच्छतेसंदर्भात मोठे काम केले : डॉ. सचिन नांद्रे !
धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांनी स्वच्छतेच्या संदर्भात खूप मोठे काम केले आहे. त्यांनी वृक्षारोपण करून शुद्ध ऑक्सिजनची निर्मिती केलेली आहे. त्याप्रमाणे आपणही आपल्या परिसरात वृक्षारोपण करून ऑक्सिजनची निर्मिती करून जनता निरोगी करण्यात सहकार्य करावे. तसेच लग्न समारंभात गेल्यानंतर तेथे अक्षता ऐवजी फुलांचा वापर केला तर त्याच अक्षता अन्न रुपाने एखाद्या भुकेल्याची भूक भागवतील हे आपण विसरता कामा नये. आपल्या महाविद्यालयातील वर्ग, परिसर, आपले घर, गाव आपण स्वच्छता हीच सेवा मानून जर परिश्रम घेतले तर स्वच्छ भारत झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे काम आपल्याला करावे लागणार आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
स्वच्छता करणे माझे कर्तव्य : मीनाक्षीताई निकम !
अधीसभा सदस्य मीनाक्षीताई निकम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. लहानपणापासून स्वच्छता ही आई वडिलांनी रुजवलेली असते. पण आपण स्वच्छता ठेवणे हे विसरून जातो. शरीराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, घर, गाव, शहर ,देश स्वच्छ ठेवण्याची सर्वांनी काळजी घेतली तर भारतातून रोगराई नष्ट होईल. त्यासाठी अगोदर आपले मन स्वच्छ केले पाहिजे आणि माझा देश-माझे कर्तव्य, माझे घर-माझे कर्तव्य, माझा परिसर-माझे कर्तव्य, स्वच्छता करणे-माझे कर्तव्य ही शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
स्वच्छता हीच खरी सेवा : सुनील निकम !
अधीसभा सदस्य प्रा. सुनील निकम यांनी स्वच्छता हीच खरी सेवा या विषयीची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना दिली. स्वच्छतेचा संदेश प्रतिज्ञा मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला आणि स्वच्छता हीच खरी सेवा हा संदेश दिला. स्वच्छता हीच सेवा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे सर हे तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम जिद्दीने राबवित आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याची त्यांची धडपड पाहून आपण सर्वांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. एक उत्कृष्ट कार्यशैली त्यांनी स्वीकारलेली आहे. त्याच पद्धतीने मीनाक्षीताई निकम यांनी स्वयंदीप संस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगार व विविध प्रोजेक्ट राबवत समाजसेवा करण्याचे काम करीत आहेत. तसेच नानासाहेब महाविद्यालय परिसरात किंवा शाळेच्या परिसरात येत असताना किंवा जात असताना ते कागद वगैरे पडलेले उचलायचे आणि कचरापेटीत टाकायचे किंवा हाती खराटा घेऊन विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन स्वच्छता करायचे. आपणही त्याच पद्धतीने स्वच्छता मोहिमेत मनापासून सहभागी होऊया आणि स्वच्छता हीच सेवा मानूया असे आव्हान विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव, उपप्राचार्य डॉ. उज्वल मगर, डॉ. जी.डी. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. आर.पी. निकम, प्रा. के.पी.
रामेश्वरकर, डॉ. सौ. उज्वला नन्नवरे, डॉ. विजय लकवाल, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. कु. हर्षदा चव्हाण हिने सूत्रसंचालन, कु. पूजा माळी हिने अतिथी परिचय तर आभार डॉ. विजय लकवाल यांनी व्यक्त केले.