जळगाव (प्रतिनिधी) जळगाव खुर्द गावाजवळ सुरु असेलल्या उड्डाणपुलाल्याची ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या ब्लॉकवर दुचाकी धडकून दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल शनिवारी घडली. विजय मुरलीधर पाटील (वय ६५ रा. नशिराबाद) असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. (Jalgaon Crime News)
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे विजय मुरलीधर पाटील हे कुटुंबासह वास्तव्यास होते. शनिवारी सकाळी खाजगी कामानिमित्ताने विजय पाटील हे (एम.एच. १९. ६९३३) या क्रमांकाच्या आपल्या दुचाकीने रावेर तालुक्यातील पिंपळगाव येथे जात होते. दरम्यान, महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून वाहनधारकांना कल्पना यावी म्हणून या ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक ठेवण्यात आले होते. वळणावर रस्त्यात टाकण्यात आलेल्या सिमेंटच्या ब्लॉकचा अंदाज न आल्याने विजय पाटील यांची दुचाकी सिमेंटच्या ब्लॉकवर धडकली. अपघातानंतर विजय पाटील हे घटनास्थळी जखमी अवस्थेत पडले होते. घटनेची माहिती मिळाल्यावर विजय पाटील यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच जखमी विजय पाटील यांना रुग्णवाहिकेतून जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून विजय पाटील यांना मृत घोषित केले.
या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांपैकी एकाने ओळख पटवण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या जखमीच्या खिशातील कागदपत्रे तपासले. यात विजय पाटील हे नशिराबाद येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार संबंधित वानधारकाने फोटो मोबाईलवर पाठवून नशिराबाद गावात माहिती कळवली. दरम्यान, उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना लक्षात यावे म्हणूनच सिमेंटचे ब्लॉक ठेवण्यात आले होते. मात्र वाहन धारकांचा जीव वाचावा म्हणून ठेवण्यात आलेल्या हेच सिमेंटचे ब्लॉक शेतकरी विजय पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत.
















