जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील सर्वांत मोठ्या नशिराबाद गावात रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणीपुरवठा, ठिकठिकाणी अस्वच्छता, आरोग्य, अशा नागरी समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले असून, तक्रारी करूनही नगरपरिषदेचे प्रशासकही लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नशिराबाद गावाची लोकसंख्या ४० हजारांपेक्षा अधिक असून, काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले. त्यानंतर नगरपरिषदेत दोन वर्षांपासून प्रशासक म्हणून रवींद्र सोनवणे हे नियुक्त आहेत. जिल्ह्यात तीन मंत्री असतानाही तालुक्यातील मोठ्या नशिराबाद गावात मूलभूत नागरी समस्यांनी ग्रामस्थ वैतागले आहेत. स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासाठी गावात दोन महिन्यांपासून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम खोळंबले आहे.
रस्त्यांचीही दैना झाली आहे. ठिकठिकाणी गटार तुंबल्या आहेत. रस्त्यावर गटाराच्या लगत ठेवलेले पेव्हर ब्लॉक आता गटारात पडू लागले आहेत. परिणामी गटारी तुंबल्या असून, दुर्गंधीने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, डास व मच्छरांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन महिन्यांपासून गावातील वरची आळी परिसर, जुनी युनियन बँकेसमोरील पेठ रोड, डबेपुरा वाडा, महाजनवाडा, दत्तमंदिर परिसरातील मागची गल्ली यांसह इतर भागांतील अनेक ठिकाणी गटारांचे खोदकाम करून ठेवत, रस्त्याच्या कडेलाच पेव्हर ब्लॉकची थप्पी लावून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पेव्हर ब्लॉक आता गटारात पडून त्या तुंबल्या आहेत. पेव्हर ब्लॉक बसविताना कोटिंग निकृष्ट झाल्यामुळे काही ठिकाणी ते निघू लागले आहेत. वरची आळी परिसरात सावता माळी मंदिराकडे जात असलेल्या गेटच्या जवळच पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू होते. तेथेच गटारीचे खोदकाम करून ठेवले आहे.
अर्धवट कामांमुळे ग्रामस्थांनाच, विशेषतः महिला, मुलांची डोकेदुखी ठरली आहे. पाणीपुरवठाही अनियमित होत आहे. ग्रामपंचायतच बरी होती, असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. मुख्य रस्त्यावरून ये-जा करणारे लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी याबाबत मूग गिळून आहेत. याबाबत तक्रारी होऊनही कोणीही लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पालकमंत्री पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील आणि संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनीही गावातील समस्यांचे संकट दूर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.