मुंबई (वृत्तसंस्था) रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणात एनसीबीने साक्षीदार बनविलेल्या किरण गोसावी विरोधात एढवन येथील दोन तरुणांना दीड लाखांना लुबाडल्याप्रकरणी केळवे सागरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पालघर तालुक्यातील एडवन या गावातील दोन तरुणांची किरण गोसावीने दोन वर्षापूर्वी फसवणूक केली होती. उत्कर्ष तरे व आदर्श किनी या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो, असं सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती. नवी मुंबई येथील कार्यालयातून तो हे रॅकेट चालवत होता. फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर उत्कर्ष व आदर्श याला मलेशियाला कामाला लावतो, असं सांगितल्यानंतर दोघांनीही गोसावीच्या बँक खात्यात पैसे जमा केले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचं तिकीट व व्हिसा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचं तिकीट व व्हिसा बोगस असल्याचं उघड झालं.
त्या दोघांनाही शॉक बसला. इथून ते पुन्हा पालघर येथे आले. घरी परतल्यानंतर ते फसवणूक केल्याप्रकरणी केळवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली नाही. दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन वर्षे उलटूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे उत्कर्ष यानं सांगितलं होतं. परंतू किरण गोसावीचे खरे कारनामे समोर आल्यानंतर आता पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.