मुंबई (वृत्तसंस्था) बिग बॉसमध्ये त्याच्या रागामुळे गाजलेला प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारला आहे. कोहलीच्या मुंबई येथील घरी NCB ची शोध कारवाई सुरू आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या टीमने शनिवार सकाळी एका ड्रग पेडलरला अटक केली आहे. या पेडरलचे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. गुप्त सूचनेच्या आधारावर एनसीबीने बॉलीवुड अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर छापेमारी केली आहे. झोनल डायरेक्टर समीर वानखेड़े यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी सुरू आहे.
केंद्रीय एजन्सी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने जेव्हापासून सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, त्यानंतर ड्रग्ज संबंधित नवनवे खुलासे झाले आहेत. पुराव्यांच्या आधारावर एनसीबीकडून बॉलिवूड आणि सिनेसृष्टीतील अनेकांच्या घरात छापेमारी करण्यात आली. यानंतर हा तपास अधिक वेगाने सुरू असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात अनेक मोठ मोठ्या अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे.
पुराव्याच्या आधारावर काहींवर कारवाईदेखील झाली आहे. TV कलाकार गौरव दीक्षित याला शुक्रवारी (२७ ऑगस्ट) अटक करण्यात आली आहे. गौरव याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी गौरवच्या घरात NCB ने छापेमारी केली होती. या छापेमारीत MD ड्रग्स, चरस आणि दूसरे ड्रग्स जप्त केले होते. चित्रपट कलाकार एजाज खान याच्या चौकशीच्या आधारावर गौरव याला अटक करण्यात आली आहे.
















