उस्मानाबाद (वृत्तसंस्था) फक्राबादचे राष्ट्रवादीचे सरपंच नितीन बिक्कड (NCPs Sarpanch Nitin Bikkad) यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरांनी गाडीवर 2 गोळ्या झाडल्या (gun firing) असून सुदैवाने बिक्कड हे बचावले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हा हल्ला नेमका कुणी केला आणि हल्लेखोर कोण होते? याची माहिती मिळू शकलेली नाही. याचीही ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. वाशी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या जीवघेण्या हल्ल्यात बिक्कड हे बचावले आहेत. पारा -फक्राबाद रोडवर नितीन बिक्कड त्यांच्या गावी जात असताना हा गोळीबार झाला. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काल रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पेट्रोल पंपाच्या कामानिमित्ताने नितीन बिक्कड हे अशोक शिनगारे यांच्या भेटीसाठी गावात गेले होते. त्यानंतर शिनगारे यांनी घरीच भेटण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे नितीन बिक्कड हे त्यांच्या घराकडे निघाले होते. यावेळी येताळ इथं पोहोचले असताना दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण आले आणि त्यांनी काच खाली करण्यास सांगितले. त्यातील एका तरुणाने गाडीच्या दिशेने गोळीबार केला. त्यातील एक गोळी ही गाडीच्या पुढील काचावर लागली आहे तर एक गोळी ड्राइवर सीटच्या बाजूला लागली आहे.