धरणगाव (प्रतिनिधी) येथील टिळक तलावाजवळ राहणारे शेजाऱ्यांची किरकोळ कारणावरून भांडण होऊन मारहाण झाल्याने धरणगाव पोलीस स्थानकात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप गोकुळदास भाटिया (वय 60, रिक्षा चालक, रा. धरणगाव) हे कुटुंबासह राहत असून, दि. 08/04/2025 रोजी रात्री 8.30 वाजता त्यांना घराबाहेर भांडणाचा आवाज आला. ते व त्यांच्या पत्नी बाहेर आले असता, मुलगा अमोल भाटिया अंगणात खाली पडलेला होता व राजेंद्र चंपालाल लोहार लाकडी दांडक्याने त्याला मारहाण करत होते. गौरव, पियुष यांनीही अमोलला लाथाबुक्यांनी मारहाण केली. दिलीप व त्यांच्या पत्नी हे सोडवायला गेले असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. यावेळी अमोल भाटिया याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून जळगावला रेफर करण्यात आले. अमोल भाटियाने सांगितले की, रिक्षा घेऊन घरी आल्यानंतर त्याने लोहार कुटुंबीयांना प्लास्टरमुळे घरावर घाण पडल्याबाबत विचारले असता त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी राजेंद्र लोहार यांच्यासह पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाटिया यांच्यासह सात जणांनाविरुद्ध गुन्हा
राजेंद्र चंपालाल लोहार (वय 61, टिळक तलावाजवळ, रा. धरणगाव) यांच्या घराचे बांधकाम सुरु असून, शेजारी दिलीप गोकुळदास भाटिया यांचे घर आहे. घराच्या प्लास्टरसाठी दिलीप भाटिया यांच्या घरावर लाकडी दांडे बांधण्यात आले होते. दि. 08/04/2025 रोजी दुपारी दिलीप भाटिया यांचा मुलगा अमोल याने या कारणावरून राजेंद्र यांच्या पत्नी व मुलीला शिवीगाळ व दमदाटी केली. रात्री 9 वाजता अमोल दारूच्या नशेत येऊन प्लास्टरमुळे घाण झाली असे सांगून शिवीगाळ करू लागला व राजेंद्र व त्यांच्या मुलगा गौरव यांना मारहाण केली. दिलीप भाटिया हेही येऊन धमकी व मारहाण केली. भांडण सोडवायला पत्नी व मुलगी आल्या असता भाटिया यांनीही त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनीही धमक्या दिल्या. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात दिलीप भाटिया यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोहेकाँ/१२७९ चंद्रकांत पाटील हे करत आहेत.
















