यवतमाळ (वृत्तसंस्था) तालुक्यातील कोसारा येथे मद्यधुंद अवस्थेत दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी होऊन पुतण्याने थेट खलबत्त्याने ठेचत आणि कोयत्याने वार करत काकाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुभाष संभाजी पचारे (वय ५०) असे मृताचे नाव आहे. तर मोहन देविदास पचारे (वय २९) असे मारेकऱ्याचे नाव आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच सुभाष पचारे आणि मोहन पचारे हे दोघेही सोबत मद्यप्राशन करत होते. दोघेही दूरवरचे गणगोत असताना दारूच्या नशेत दारूसाठी त्यांचा शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला जावून मोहन पचारे याने दगडी खलबत्ता सुभाष पचारेच्या डोक्यावर मारला. यामध्ये सुभाष पचारे रक्तबंबाळ व निपचित पडला. त्यानंतर मोहनने मृतकाच्या शरीरावर पुन्हा कोयत्याने वार केले. या घटनेत सुभाषचा जागीच मृत्यू झाला.
सुभाष पचारे हे मागील २० वर्षांपासून रोजमजुरी करीत एकटेच जीवन जगत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी राहते. खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे, मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून मारेकऱ्यास ताब्यात घेतले. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.
















