जळगाव (प्रतिनिधी) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रत्नागिरी येथील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत टीका केली होती. त्यांच्या टीकेला गुलाबरावांनी सडेतोड आणि खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. “नितेश राणे कोण आहे? हे नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेले पिल्लू आहे. ते काय आम्हाला शिकवणार?”, अशा शब्दांत गुलाबरावांनी निशाणा साधला.
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे वीज उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर गुलाबराव पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती होती. गुलाबराव पाटील यांच्यासारखे खंबीर नेतृत्व जिल्ह्याला लाभले असल्याचे सांगत मंत्री राऊत यांनी ऑनलाईन मनोगतात मंत्री पाटील यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
आंदोलकांनी प्रवासी वाहने रोखून नागरिकांना वेठीस धरु नये
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना गृह विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याने त्या निषेधार्थ राज्यभरात भाजप आंदोलन करत आहे. याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, “आंदोलन करण्याचा हा सर्वांनाच अधिकार आहे, फडणवीस यांच्यासोबत काही चुकीचे झाले असेल असे त्यांना वाटत असेल म्हणून ते आंदोलन करत आहे. आंदोलन करणे चुकीचे नाही. मात्र या आंदोलनाचा नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, रुग्णवाहिका असो किंवा प्रवासी वाहने रोखून नागरिकांना वेठीस धरु नये”, असा टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी राज्यभरात आंदोलन करणार्या भाजपला लगावला.
‘…तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता’
वीज उपकेंद्राच्या कार्यक्रमाप्रसंगी मनोगतात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातल्या तत्कालीन पालकमंत्री गिरिश महाजन यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. “शंभर कोटी रुपये डीपीडीसीतून जिल्ह्यासाठी देणारा मी एकमेव पालकमंत्री असल्याचे स्पष्ट केले. एकहाती सत्ता असतानाही माजी पालकमंत्र्यांना जमले नाही. केवळ राजकारण करुन अधिकार्यांना धमकाविणे एवढेच काम त्यांनी त्यांच्या काळात केले. त्यांनी निधी दिला असता तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता”, असेही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले