मुंबई (वृत्तसंस्था) रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. सध्या प्रसारमाध्यमांकडून धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी खासगी गाडीतून चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले, या गाडीच्या काचा पूर्णपणे काळ्या होत्या. यात आतमध्ये कोण बसलं हेदेखील दिसत नव्हते, इतकचं नव्हे तर कोणत्याही सुरक्षेचा ताफा न घेता धनंजय मुंडे यांनी माध्यमांना चकवा देत मुंबईतील शासकीय निवासस्थानी एन्ट्री केली.
फेसबुकवर दिलेले स्पष्टीकरण वगळता धनंजय मुंडे यांनी याप्रकरणात अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. प्रसारमाध्यमांचा हा ससेमिरा टाळण्यासाठीच धनंजय मुंडे प्रत्येक ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेत आहेत. बलात्काराच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे सध्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणे तेवढेच महत्वाचे आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडल्याचे समजते.
तत्पूर्वी बुधवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीलाही गेले होते. त्यामुळे आता नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
त्यातच मीडियाचा ससेमिरी चुकवण्यासाठी धनंजय मुंडे भल्या पहाटे मलबार येथील शासकीय बंगल्यात दाखल झाले, प्रसारमाध्यमांचे कॅमेरे धनंजय मुंडे यांच्यामागे आहेत, या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. यातच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या मुलांबाबत माहिती लपवली असल्याचा आरोप केला. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावरही टांगती तलवार कायम आहे.