छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) कॅफेच्या नावाखाली छोट्या छोट्या कॅबीन तयार करून तरुणाईला अश्लिल करू देणाऱ्या कॅफेवर धडक कारवाई करण्यात आली आहे. क्रांती चौकातील कॅफे हॉलिडेमध्ये गुन्हे शाखा आणि दामिनी पथकाने छापा मारून चार जोडप्यांना पकडत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील काही कॅफेमध्ये सतत तरुण तरुणींची गर्दी असल्याची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे कॅफेमध्ये नेमके चालते तरी काय? याची माहिती घेण्यासाठी गुरुवारी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुधीर वाघ, दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या पथकाने छापा मारला. तेव्हा कॅफेमध्ये चार जोडपे असभ्य वर्तन करताना दिसून आले.
पोलिसांनी कॅफेची पाहणी केली तेव्हा फर्निचर करून जोडप्यांना एकांतात बसता येईल, अशी जागा तयार केल्याचे दिसून आले. एका चिंचोळ्या जिन्यातून जोडपे वर गेले की त्यांच्यावर पुन्हा कोणाचेही लक्ष नसते. आतामध्ये मंद प्रकाश, बसण्यासाठी छोटे-छोटे सोफे ठेवलेले आढळले. उपनिरीक्षक विकास खटके यांनी चारही जोडप्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.