चाळीसगाव (प्रतिनिधी) धुळे ते कन्नड मार्गावरील भोरस फाट्याजवळ दोन ट्रकची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे सुमारे ५ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर कंपनीचा ट्रक (एमएच-२०, जीझेड- १२६७) ही धुळ्याहून कन्नडकडे जात होती. या वेळी या ट्रकचा चालक सागर ताराचंद चव्हाण (वय २७, रा. सातकुंड, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) हा पुढे चालणाऱ्या आयशर कंपनीच्या ट्रक (एमएच १५, एचएच-५३३१) जवळ पोहोचला. त्या गाडीने अचानक ब्रेक मारून ट्रक रस्त्यावर थांबवल्याने मागून आलेली आयशर (एमएच- २०, जीझेड- १२६७) ची त्यावर जबर धडकली. या भीषण अपघातात चालक सागर चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. ही घटना आज पहाटे सुमारे ५ वाजेच्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात उपचारार्थ हलवले. तसेच अपघातामुळे ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो. नि. शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय शिंदे करत आहेत.