नवी दिल्ली (वृत्तसंस्था) श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. देशातील पेट्रोल संपलं आहे. श्रीलंकेत फक्त एक दिवस पुरेल इतकाच पेट्रोलचा साठा शिल्लक आहे. परकीय चलनाचा साठाही संपल्याने श्रीलंकेकडे पेट्रोल खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीच ही माहिती दिली आहे.
इंधन तुटवड्याचं भीषण वास्तव सांगणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं की, ‘देशात केवळ एक दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा शिल्लक आहे. तेलाच्या तीन शिपमेंट आयात करण्यासाठी लागणारे डॉलर्सही सरकार जमा करू शकत नाही. तेलाची जहाजं पेमेंटसाठी कोलंबो बंदराबाहेर वाट पाहत आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
खरंतर, श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात विक्रमी स्तरावर महागाई वाढली आहे. दिवसातून तब्बल १८-१८ तास वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. अशात देशातील २२ दशलक्ष लोकांना अन्न, इंधन आणि औषधं पुरवण्यासाठीही सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. देशभरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर ‘नो पेट्रोल’चे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही तासांत देशातील वाहनांची हालचाल ठप्प होणार आहे.